केज मतदारसंघातील म्हत्वाच्या प्रश्नावर विधानसभेत आमदार मुंदडांनी आवाज उठवला

आडससह तीन ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी
लोकगर्जना न्यूज
केज मतदारसंघातील पोलीस ठाणे इमारती तसेच आरोग्याशी निगडित नवीन इमारती तसेच आडस व इतर ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजुरी देणे तसेच ऊस प्रश्न उपस्थित करत, आमदार नमिता मुंदडा यांनी आज शेतकरी, सामान्य जनतेच्या दररोजच्या अडचणींवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत आवाज उठवला आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आज मतदारसंघातील सामान्य जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला असून, दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाला असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढल्याने त्याला तुरा आला तरी तो गाळपा अभावी शेतात उभं आहे. १६ ते १८ महिने झाले तरी ते गाळपासाठी न गेल्याने वजन घटल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. ऊस प्रश्नी शासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच आरोग्याशी निगडित मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्ण वाहिका तसेच भावठाणा व काळेगाव येथे आरोग्य केंद्रांसाठी इमारत, वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या आरोग्य सेवा पहाता आडस, विडा, बनसारोळा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात यावीत. तसेच लोखंडी सावरगाव येथे असलेल्या महिला रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी कमतरता असून अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे महिला रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. आज महिला दिनाचे औचित्य साधून येथील पदे भरुन महिलांची गैरसोय टाळावी. नेकनूर व युसुफ वडगाव येथील पोलीस ठाण्याच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून येथे काम करावे लागते. त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्यांना नवीन इमारती मंजूर करावे. अंबाजोगाई येथील पोलीस वसहातेतील निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथील पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारत मंजूर करावे. लोखंडी सावरगाव महिला हॉस्पिटल सह अंबाजोगाई व केज तालुक्यात नवीन पोलीस चौक्या सुरू कराव्यात. अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावे युसुफ वडगाव व धारुर पोलीस ठाण्यांशी जोडण्यात आलेली आहेत. ती सर्व गावे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यशी जोडावी असे जनसामान्यांशी निगडित प्रश्नांवर आमदार मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले.
सर्व ऊस गाळप करण्याचे सहकार मंत्र्यांचे उत्तर
बीड, नाशिक, जालना, परभणी व सातारा जिल्ह्यातील काही भागातील ऊसाचा प्रश्न आहे. यासह सर्वच ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. साखर आयुक्त यांच्याशी समन्वय साधून पुर्ण ऊसाचे गाळप करण्यात येईल असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रश्नाला उत्तर दिले