केज पाठोपाठ आडसमध्ये अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा पडणार
सा. बां. उप. वि. धारुर कडून नोटीस;आठ दिवसाची मुदत

लोकगर्जनान्यूज
केज : शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाने बुलडोझर फिरवून अतिक्रमण काढण्यात आले. केज नंतर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे आडस येथील धारुर रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा पडणार आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारुर कडून गुरुवारी अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली असून आठ दिवसता रस्ता मोकळा करण्याची मुदत दिली. यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचे नोटीसीत म्हटले आहे.
केज शहरातील छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढून मोठ्यांचे ठेवण्यात आले असल्याचा आरोप होत असल्याने ही अतिक्रमण हटाव मोहिम सध्यातरी एकतर्फी असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर आता तालुक्यातील आडस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खोडस फाटा या धारुर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारुर कार्यालयाने रस्त्याची मोजणी करुन पंधरा मीटर ( ५० फूट ) च्या आत येणाऱ्यांना गुरुवारी ( दि. ६ ) नोटीस देण्यात आली. आठ दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करत जर यावेळेत अतिक्रमण नाही काढले तर आठ दिवसांनंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे धारुर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार असे दिसून येत आहे.
अतिक्रमण नेमकं का काढण्यात येत आहे?
अतिक्रमण काढून घ्या म्हणून नोटीस मिळाल्या, मोजणीही झाली. परंतु नेमकं अचानक अतिक्रमण विरोधात कारवाई का केली जात आहे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून रस्ता दुरुस्तीचे टेंडर निघालं आहे. त्यामुळे रस्त्याचे काम होणार आहे म्हणून अतिक्रमण काढले जात आहे की, आणखी काही वेगळे कारण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.