डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात पीक वाया गेले धारुर तालुक्यातील शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील उमरेवाडी येथील का शेतकऱ्याने डोक्यावर आधीच कर्जाचे डोंगर त्यात परतीच्या पावसाने पीक गेले कर्ज कसे फिटणार या चिंतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविला आहे.
सुर्यकांत लक्ष्मण खोत ( वय ५० वर्ष ) रा. उमरेवाडी ( ता. धारुर ) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच शेती नुकसानीत जात असल्याने कर्ज घेऊन शेती करत असे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडावं म्हणून रिक्षा घेतला. आडस ते आसरडोह-उमरेवाडी असा चालवून कुटुंबाचा गाडा ओढत असे. पण वाढती महागाई शेतीत नेहमीच नुकसान, रिक्षालाही धंदा नाही. कर्जाचा डोक्यावरील ओझं काही कमी होईना. यावर्षी परतीच्या पावसाने पीक हिरावून नेला. आता कसं जगायचं या चिंतेत असलेल्या सुर्यकांत खोत यांनी आज पहाटे धारूर-आसरडोह रस्त्यावर घरापासून जवळच असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली. घटनेची पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी सहकारी कर्मचारी सह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविला आहे. या घटनेने उमरेवाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत सुर्यकांत खोत यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.