केज तालुक्यात खळबळ; पोलीसांनी पकडले अवैध धारदार शस्त्रे

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील नांदूर घाट येथे विक्रीसाठी आणलेल्या तलवारी पोलीसांनी छापा मारुन पकडला असून, ही कारवाई एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने केली आहे. धारदार शस्त्रे पकडल्याची बातमी कळताच तालुक्यात खळबळ उडाली असून, शस्त्र साठा असेल का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पंकज कुमावत यांचे पथक नांदूर घाट येथे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवारी ( दि. २ ) गेले होते. यावेळी त्यांना गुप्त खबऱ्या कडून गावात दोघांनी तलवारी विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. यातील एक जण तलवारी घेऊन मच्छी बाजारात येणार असल्याचे सांगितले. माहिती मिळताच पथकाने याची माहिती कुमावत यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी मच्छी बाजारात सापळा रचून अजय त्रिमुखे यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याकडे दोन तलवारी मिळून आल्या ज्याची किंमत ३ हजार ५०० रु. आहे त्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी जमादार बालाजी दराडे यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय तुकाराम त्रिमुखे, ओम गोंद्रे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण भागापर्यंत अवैध शस्त्र विक्रीचे लोण पसरले असल्याचे दिसून येत असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.