कृषी

विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा केज तहसीलवर धडकला

शेतकरी एकत्र आले तरच शासन दखल घेईल- रविकांत तुपकर

 

केज : अतिरिक्त ऊस प्रश्नांसह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश व आसूड मोर्चाचे आयोजन केले होते. आज मंगळवारी ( दि. २४ ) अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थित हा मोर्चा तहसीलवर धडकला. शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जोपर्यंत एकत्र येऊन रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तुमची दखल शासन घेणार नाही. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मोर्चाला संबोधित करताना म्हणाले.

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून, २० महिने होत आहेत तरीही ऊस शेतात उभा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. गतवर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून गेल्या आहेत. तसेच अनेक बंधारे, रस्ते वाहून गेले आहेत. पाऊस तोंडावर आलेला असून याची अद्याप दुरुस्ती झाली नाही. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा आक्रोश आसूड मोर्चा आयोजित केला. हा मोर्चा जयभवानी चौक ते तहसील कार्यालय असा होता. मोर्चा मध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले. मोर्चा तहसीलवर पोहचल्यानंतर याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले की,मराठवाड्यातील शेतकरी विविध समस्यांनी परेशान झाला आहे. जिल्ह्यात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ग्रामीण रस्त्यांची वाताहत झाली आहे. मूलभूत प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी मंदिर-मस्जिद, हनुमान चालिसा असे वाद उकरून काढले जात आहेत. अलीकडे माध्यमातील संवेदनशीलता हरवत चालल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले की जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ऊस पेटवून देऊन स्वतः आत्महत्या केली. माध्यमांनी एक दिवस बातम्या देऊन कर्तव्य निभावले. याउलट ड्रग केसमध्ये अडकलेल्या शहारुख खानच्या मुलाच्या दैनंदिनीचे मात्र महिनाभर लाईव्ह टेलकास्ट सुरू होते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठावे लागेल. आंदोलनाला प्रत्येक घरातून एक तरी माणूस यायला हवे. क्रांतिसिह नाना पाटलांना निवडून देणारा हा जिल्हा असून जिल्ह्याला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या समस्यांचा सोडवणुकीसाठी संघर्षाची तयारी ठेवा. तुमच्यासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे.तुम्ही साथ दिली तर आपण सरकारला गुडघे
टेकायला भाग पाडू असे आवाहन तुपकर यांनी केले. यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व केज मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »