केज तालुक्यातील काही तरुणांना झालंय तरी काय?
पुन्हा एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल... आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

केज : मुलीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल का केले? असा जाब विचारणाऱ्या पित्याचा खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे फोटोचे स्टेट्स ठेवून तसेच वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदरील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटना उघडकीस येताच केज तालुक्यातील काही तरुणांना नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील तरुणी महाविद्यालयात जात असताना रोड रोमिओ सोमेश्वर संदीपान महाडीक याने मोबाइलद्वारे फोटो काढून ते फोटो व्हाट्सॲपच्या स्टेट्सला ठेवले. याने समाधान झाले झाले नसल्याने तरुणीच्या मामा व चुलत्यांना व्हाट्सअपवर पाठविले. तरुणीचा वाईट हेतुने हात धरून विनयभंग केला. असल्याची फिर्याद ( दि. ५ ) तरुणीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे. या फिर्यादीवरून सोमेश्वर संदीपान महाडिकच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५६/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ४५२, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे प्रकरणाचा तपास करीत आहेत. ही घटना उघडकीस आल्याने रिकाम टेकड्या पोरांचा बंदोबस्त करण्याची तसेच चिडीमार पथक कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.