केज तालुक्यातील एकाचे वडवणीतून अपहरण; सोडण्यासाठी १२ लाखांची मागणी

केज : तालुक्यातील लव्हरी येथील चाळक नावाच्या व्यकतीचे वडवणी येथून हॉटेलमधून अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे केज तालुक्यात खळबळ माजली आहे. सोडण्यासाठी अपहरण करणारे १२ लाख रुपयांची मागणी करत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. तर हा प्रकार कारखान्याला मजुर पुरविण्याच्या आर्थिक व्यवहारातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुधाकर ( सुदाम ) चाळक रा. लव्हरी ता. केज असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते महालक्ष्मी साखर कारखान्याला मजुर पुरविण्याचे काम करतात. (दि. १६ ) फेब्रुवारीला सुधाकर चाळक वडवणी येथे गेले. त्यानंतर परत न आल्याने नातेवाईकांनी ( दि. २५ ) बेपत्ता असल्याची तक्रार केली. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे रविवारी ( दि.२७ ) चाळक यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलास फोन आला. परंतु त्यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्ती हिंदीतून बोलत होते. चाळक यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. त्यांना अमानूष मारहाण होत असावी, मुलगा फोनवरून मारु नका अशी विनंती करत होता. यावेळी अज्ञात अपहरण करत्यांनी वडीलांना सोडवायचे असेल तर १२ लाख रुपये शंकेश्वर साखर कारखाना ( कर्नाटक ) येथे घेऊन येण्यास सांगितले आहे. पैसे नाही आणले तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची फिर्याद मुलगा अक्षय चाळक यांनी दिली. त्यावरुन अज्ञात आरोपीच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. परंतु यामध्ये लेबर पुरवठा, साखर कारखाना याचा संदर्भ येत असल्याने हा प्रकार आर्थिक व्यवहारातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.