केज जवळ पिकअप लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:बीड एलसीबीने चार दरोडेखोर पकडले

लोकगर्जना न्यूज
केज : नातेवाईकाचे अंत्यविधी व रक्षा सावडण्याचा विधी उरकून पुणे येथे जाणाऱ्या पिकअपला कार आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवून ७२ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना चार दिवसांपूर्वी केज-मांजरसुंबा रस्त्यावर कोळवाडी जवळ घडली होती. या टोळीचा बीड एलसीबीने पर्दाफाश करत चार जणांना अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी (दि. २७ ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खतगाव जि. नांदेड येथील धनाजी किसनराव भोसले हे चुलत्याचे अंत्यविधी व रक्षा सावडण्याचा विधी उरकून कुटुंब व इतर नातेवाईकांसह पिकअप क्रमांक एम.एच. १२ टी व्हि ३९०५ ने पुणे येथे चालले होते. दरम्यान ते केजच्या पुढे गेले असता कोळवाडी जवळ पाठी मागून आलेल्या सिल्व्हर रंगाच्या कारने ओव्हरटेक करुन पुढे येत कार आडवी लावली. कोयत्याचे धाक दाखवून रोख रक्कम व महिलांच्या अंगावरील दागिने असा एकूण ७२ हजार ३५० रू. ऐवज लुटून नेला. याप्रकरणी धनाजी किसनराव भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड एलसीबीला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीने असे गुन्हे करणाऱ्या बीड, सोलापूर, लातूर, नांदेड,पुणे, अहमदनगर जिल्ह्यात माहिती घेऊन तपास सुरू केला. यावेळी पो.नि. एच.पी. कदम यांना गुप्त खबऱ्या कडून सदरील गुन्हा लखन जिजाराम साळवे रा. राशिन ता. कर्जत ( जि. अहमदनगर ) याने इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच बीड एलसीबीने राशिन येथे जाऊन लखन साळवे यास ताब्यात घेतले. या गुन्ह्या बाबतीत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे रा. जवळा ( जि. नांदेड ), वैभव आजिनाथ हजारे जवळा, अविनाश परशुराम गायकवाड रा. हडपसर पुणे, शुभम रमेश मोरे रा. पापडी वस्ती हडपसर, पुणे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. यातील ज्ञानेश्वर कोल्हे व वैभव हजार या दोघांना जवळा येथून तर अविनाश गायकवाड यास हडपसर येथून ताब्यात घेतले आहे. शुभम मोरे यास ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले परंतु हडपसर पोलीसांनी त्यास दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली आहे. ती कारवाई पुर्ण करुन त्यास बीड पोलीस ताब्यात घेईल. कोणताही पुरावा नसताना अवघ्या चार दिवसांत बीड एलसीबीने या रोडरॉबरीचा छडा लावल्याने कौतुक करण्यात येत आहे.