पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी केला तीन ठिकाणी हात साफ; पिंपळनेर येथे बियर बार व किराणा दुकान फोडले

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बियर बार व एक किराणा दुकान फोडून लाखोंचा माल लंपास केला. आज सकाळी घटना उघडकीस आली असून विशेष म्हणजे हे दोन्ही ठिकाणी येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे एकाप्रकारे हे पोलीसांना चोरट्यांचे आव्हान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
सुभाष चरखा यांचे तिरुपती किराणा दुकान फोडून आतील सामान व रोख रक्कम लंपास केली. तसेच यानंतर चोरट्यांनी नाथापूर चौकातील जय बियर बार मधील दारूचे ४० बॉक्स,३५ हजार रोख रक्कम तसेच बीड रोडवरील यश बार मध्येही हात साफ करत जवळपास दिड लाख रोख रक्कम दारुचे बॉक्स लंपास केले. आज सोमवारी सकाळी घटना उघडकीस आली. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पिंपळनेर येथे मागील काही महिन्यांपासून सतत चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु त्या किरकोळ असल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तब्बल तीन ठिकाणी चोरी व लाखोंचा ऐवज लंपास ही मोठी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.