केजचे पुढारी अनभिज्ञ असलेतरी प्रशासन सावध मिरवणूक प्रकरणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह २०० जणांवर गुन्हा दाखल

केज : येथील नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी नंतर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक चांगलीच अंगलट आली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलल्याने पदभार स्वीकारण्या पूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह एकूण २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुढारी आनंद साजरा करण्याच्या नादात मानाई आदेशा बाबतीत अनभिज्ञ तर पोलीस आपल्या कर्तव्या प्रति सावध दिसून आल्याची चर्चा केज तालुक्यात सुरू आहे.
सोमवारी ( दि. १४ )केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी नंतर मंगळवार पेठ ते कृषी उत्पन्न बाजार समिती अशी विजयी मिरवणूक काढली होती. मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत जमाव बंदीचा आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश जा. क्र. २०२३/आरबी-डेस्क -१/ पोल -१ / कावि अनुषंगाने बीड जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मनाई आदेश लागु आहे. त्यामुळे मिरवणुक काढण्यात येऊ नये. कोणतेही डॉल्बी लावून गाणे वाजवु नये. या बाबत दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे केज प्रभारी अधिकारी यांनी सी आर पी सी कलम १४९ प्रमाणे समजपत्र दिले. तसेच प्रत्यक्ष भेटुन याबाबतीत अवगत केले होते. ( दि. १४ ) दुपारी १:०० पोलीस उपनिरीक्षक पाटील , सहाय्यक फौजदार महादेव गुजर, उमेश आघाव, रमेश सानप, मंगेश भोले, शेख, म्हेत्रे, महादेव बहीरवाल हे निवडणूक बंदोबस्तकामी नगर पंचायत कार्यालय येथे हजर होते. माहिती असतानाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला दुर्लक्षित अथवा विसर पडल्याने केज नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सीता बनसोड, उपनगराध्यक्षा सौ. शीतल दांगट, जनविकास आघाडी प्रमुख हारुण इनामदार, अंकुश इंगळे, आदीत्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, सोमनाथ गुंड, सुग्रीव कराड, पल्लवी रांजनकर, पदमीन शिंदे, शकील ईनामदार यांनी दिडशे ते दोनशे समर्थक जमवून नगरपंचायत कार्यालयापासून दुपारी १ ते ४:३० पर्यंत चारचाकी वाहन क्र. एमएच-४४ यू-९७९ , एमएच-०३ एच-३६१९ मधून तसेच समोर २०० कार्यकर्ते वाजत गाजत मंगळवारपेठ, धारुर चौक, बसस्थानक मार्गे शिवाजी चौक ते कळंब रोड, फुले नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत विजयी मिरवणुक काढली. याबाबतीत गोपनिय शाखेचे अंमलदार मतीन शेख यांचे मार्फत व्हिडीओ कॅमेरा व्दारे चित्रीकरण करण्यात आले आहे. जमाव जमवून मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन मिरवणुक काढली म्हणून पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु र नं ३९/२०२२ भा दं वि. १४३, १८८ व १३५ प्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकारी व समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.