कांद्याचा वांदा! १७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया
मायबाप सरकार किती दिवस करणार शेतकऱ्यांची थट्टा

लोकगर्जनान्यूज
आष्टी : शहरापासून सतरा किलोमीटर अंतरावर असणारे बावी हे गाव डोंगर कपारीच्या कुशीत वसलेलं हे गाव, या परिसरात रानडुकराच्या त्रासामुळे धान्य, कडधान्य पिके घेता येत नाहीत.त्यामुळे आठ ते दहा वर्षापासून येथील शेतकरी फक्त कांदा हे पीकच घेतात. कांदा हे पीकच जीवन जगण्याचा एकमेव आधार आहे. आठ दहा वर्षांपूर्वी रानडुकराच्या त्रासामुळे इतर पिके घेणे या परिसरातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केले. कांदा या पिकाची रानडुकरांना नासाडी करता येत नाही म्हणून हेच जगण्याचा आधार बनलेलं गाव.त्यातच गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे पडलेल्या भावाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केले. येथील नामदेव लटपटे यांनी 844 किलो कांदा नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला. या मोबदल्यात त्यांच्या हाती पट्टी म्हणून एक रुपयाचा ठोकळा व्यापाऱ्याने टेकवला.
आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी मोठ्या कष्टाने कांदा पीक घेतलं. काढणी झाल्यानंतर दोन पैसे मिळतील म्हणून विक्रीसाठी लटपटे अहमदनगर येथील बाजारपेठेत घेऊन गेले. एकूण १७ गोण्याचे ८४४ किलो वजन भरले. दोन रूपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. एकूण पट्टी १६८८ रूपये, यातुन १४६१ रूपये भाडे खर्च गेला,२२१ रूपये उचल गेली ,इतर खर्च ५ रूपये हे सगळे वजा होता हातात केवळ एक रूपया पडला. हजारो रूपये खर्च करून कांदा लागवड, मेहनत ,खत, औषध एवढा खर्च होऊन जर शेतकऱ्यांच्या मालाला सरकार भाव देत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे. खर्च हजारात आणि एक रूपया हातात ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कांद्याला दहा रुपये किलो अनुदान द्या: नामदेव लटपटे
तीन महिन्यापुर्वी 20 गुंठे क्षेत्रात कांदा लावला. 30 हजार खर्च झाला. अवघा दोन रूपये किलोचा भाव मिळाला अन् हातात एक रूपया आला. मायबाप सरकारने योग्य बाजारभाव द्यावा व होणारी थट्टा थांबवावी. कांद्याला मायबाप सरकारने दहा रुपये किलो प्रमाणे अनुदान त्वरित देऊन शेतकऱ्यांचे थट्टा थांबविण्याची मागणी केली आहे.
बावीपासून अहमदनगरचे अंतर जवळपास 70 किलोमीटर
आदल्या दिवशी कांद्याची गाडी घेऊन गेलो. रात्रभर मार्केटमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लीलाव झाला आणि पट्टी घ्यायला गेलो तर एक रुपया हाती पडला. दिवसभर उपाशीपोटी होतो. खायचं तर सोडाच परंतु गावाकडे यायलाही पैसे जवळ राहिले नव्हते. तेथे आमच्या गावाकडून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे हात पसरून गावाकडे येण्याची खर्ची भागवली व मोकळ्या हाताने परत आलो. कांद्याची पट्टी आल्यानंतर खत, औषध, बियाणाचे उधारी द्यायची होती.घरात किराणा सामान आणायचे होते मात्र एक रुपया पट्टी आल्याने आता हतबल झालो आहे.