करुणा मुंडे-शर्मांनी ‘शब्द’ फिरवला

लोकगर्जना न्यूज
महिनाभरापूर्वी राजकीय पक्षाची घोषणा करुन गरज पडली तर परळी मधून निवडणूक लढविणार असे वक्तव्य करुणा मुंडे-शर्मा यांनी अहमदनगर येथे केले होते. परंतु हा शब्द फिरवत त्यांनी मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. माझ्या मुलालाही राजकारणात आणणारं नाही परंतु त्याची इच्छा असेल तर रोखणारही नाही असे संगमनेर येथे बोलताना त्या म्हणाल्या आहेत.
महिन्याभरा पुर्वी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत घेऊन करुणा मुंडे -शर्मा यांनी शिवशक्ती सेना या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी गरज पडली तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे ही वक्तव्य केले होते. तर जानेवारी महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे असे सांगितले होते. त्यांनी संगमनेर पासून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. परंतु करुणा यांच्या भूमिकेत बदल दिसत असून, परळीतून निवडणूक लढविणार या वक्तव्यावरून त्यांनी सपशेल माघार घेतल्याचे दिसून आले. संगमनेर येथे बोलताना करुणा मुंडे-शर्मा म्हणाल्या की, वैयक्तिक मी, कोणतीही निवडणूक लढविणार नाही आणि माझ्या मुलालाही राजकारणात येऊ देणार नाही. परंतु भविष्यात त्याला राजकारणात यावे वाटले तर रोखणार ही नाही. मी त्याची आई आहे मालकीण होणार नाही. राजकारणात सध्या नैतिकता राहिलेले नसून पैसा, स्वार्थासाठी सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करत भ्रष्टाचार व अत्याचार मुक्त महाराष्ट्रासाठी मी पक्ष स्थापन केला असल्याचे सांगत पुर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.