एका रस्त्याचे काम सुरू झाल्याने श्रेय घेण्यासाठी आजी-माजी आमदाराची चढाओढ
मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर पायी चालणे मुश्कील याला जबाबदार कोण?

लोकगर्जना न्यूज
जवळपास तीन वर्षांपासून बंद पडलेल्या अंबाजोगाई-येल्डा रस्त्याचे काम अखेर दोन दिवसांपासून सुरू झाले. यामुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु आजी-माजी आमदारांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी कामाच्या ठिकाणी भेट दिली. दोघांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पाठपुराव्यामुळे काम सुरू केल्याचा दावा केला. एका रस्त्याचे काम सुरू झाले तर श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. मग अनेक रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था असून पायी चालणे मुश्कील झाले आहे. मग याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पंकजा मुंडे पालकमंत्री असताना या ११ कि.मी. अंतर असलेल्या अंबाजोगाई ते येल्डा रस्त्याला मंजुरी मिळाली. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याच्या कामाला प्रत्येक्षात सुरुवात झाली. काही काम झाल्यानंतर जवळपास तीन वर्ष हे काम बंद पडले यामागे कोरोनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. या तीन वर्षांत खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे येल्डा व परिसरातील नागरिकांना काय त्रास झाला हे शब्दात मांडता येणार नाही. यातून सुटका व्हावी म्हणून मनोमन इच्छा व्यक्त केली जात होती. भेटतील त्यांना रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करत असे. कसेबसे या रस्त्याचे ग्रहण सुटले असून दोन दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सुरू झालेलं काम पाहून सामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु पुढारी व कार्यकर्त्यांना श्रेयाची चिंता लागली आहे. काम सुरू झाले म्हणताच आमदार नमिता मुंदडा तसेच माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्याचा कामाला भेट देऊन पाहणी केली. संबंधित अभियंता व गुत्तेदाराला दर्जेदार काम करण्याची सूचना केल्याच्या व दोघांच्या ही कार्यकर्त्यांनी आमच्या पाठपुराव्यामुळे काम सुरू झाल्याचा दावा केला. साठे यांचे कार्यकर्ते साठे साहेबांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तसेच गुत्तेदाराला बोलावून घेऊन काम सुरू करण्यास सांगितले त्यामुळे काम सुरू झाले असा दावा करत आहेत. तर, विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे कार्यकर्ते ताईंनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. तसेच वेळोवेळी बांधकाम विभागाशी नियमित पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू झाले असा दावा करण्यात येत आहे. या आशयाच्या बातम्या ही आल्या आहेत. हे श्रेय वाद पाहून केज मतदार संघातील नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली असून, मतदारसंघातील एका रस्त्याचे ( बंद पडलेले ) काम सुरू झाले. त्याचे श्रेय घेण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. मग मतदार संघातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यावरून वाहन चालविणे तर सोडा पायी चालणे ही मुश्किल झाले आहे. मग या रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? त्या रस्त्यांसाठी तुम्ही प्रयत्न केले म्हणून काम सुरू झाले मग इतर रस्त्यांसाठी प्रयत्न केले नाहीत का? की, प्रयत्न करण्यात कमी पडलात त्यामुळे अनेक रस्ते खड्ड्यात हरवली आहेत. असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.