मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांचे आंदोलन मागे

लोकगर्जनान्यूज
जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलन मागे घेतले.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी ( जि. जालना ) येथे मागील १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते. आज गुरुवारी ( दि. १४ ) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री आश्वासन देत आता तुम्ही उपचार घ्यावेत अशी विनंती केली. या विनंतीला मान देत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलन मागे घेतले. तब्बल १७ व्या दिवशी आंदोलन सोडविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. यावेळी मनोज जरांगे यांचे वडील उपस्थित होते. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.