
बीड : जिल्ह्यातील आडस ( ता. केज ) येथील एका तरुण शेतकऱ्यास दुर्मिळ असा पांढरा बेडूक आढळा असून याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. ही बेडकाची प्रजातीचं वेगळी आहे की, वातावरणातील बदलामुळे बेडकाचा रंग बदलला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच शेतकऱ्याने विजेच्या खांबावर व तारेवरही काही बेडूक बसल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगितले.
बेडूक तर आपण अनेक पाहिले आहेत. परंतु पांढरा बेडूक शक्यतो कोणी पाहिला नसावं, पण आडस ( ता. केज ) येथील तरुण उमेश आकुसकर हे मंगळवारी ( दि. १९ ) दुपारी स्वतः च्या होळ रोडवर असलेल्या शेतात गेले होते. त्यांची लिंबुनीची बाग असून बागेत झाडावरून गळून पडलेले लिंबू वेचायला सुरवात केली. यावेळी त्यांना पांढरं काहीतरी आहे म्हणून हात लावताच त्याने टुणकन उडी मारली, तेव्हा हा पांढरा बेडूक असल्याचे लक्षात आले. हिरवं, पिवळा, राखाडी अशा विविध रंगाचे अनेक बेडूक पाहिले पण पांढरं बेडूक प्रथमच दिसल्याने उमेश यांनी त्याचे फोटो काढले व सोशल मीडियावर टाकले. यानंतर पांढरा बेडूक आढळल्याची चर्चा सुरू झाली. अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच अनेक वृध्दांनीही आम्ही पांढरं बेडूक असतो हे प्रथमच ऐकले व पाहिल्याचे सांगितले. तर हा नेमका वातावरणातील बदलांचा परिणाम आहे की, ही प्रजातीच वेगळी आहे याबाबत अधिक काही माहिती मिळू शकली नाही. या दुर्मिळ पांढऱ्या बेडकाची चर्चा जोरदार सुरू आहे.