आनंदाची बातमी! मांजरा १०० टक्के भरले;दोन दरवाजे उघडले

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण कधी भरणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते.अखेर ही आनंदाची बातमी सकाळी कानी पडली असून दोन दरवाजे उघडून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलं आहे.
बीड, लातूर, उस्मानाबाद येथील शेती अन् माणसांची तहान भागवाणारा मांजरा धरण शनिवारी ( दि. १५ ) दुपारी १२ वाजेपर्यंत ९८.६८ टक्के भरले होते. त्यामुळे शंबर टक्के कधी होणार या आनंदाच्या बातमीकडे जनतेचे लक्ष लागले होते. अखेर आज रविवारी ( दि. २६ ) सकाळी मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याची बातमी समजली आहे. सकाळी पावणे नऊ वाजता १ व ६ नंबर असे दोन दरवाजे उघडले आहेत. यातून १७४७.३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मांजरा काठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी,मजुर, सामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंत धरण भरले १५ वेळा
मांजरा धरण १९८० मध्ये पुर्ण झाले आहे. याचे आता ४२ वर्ष वय झाले आहे. या ४२ वर्षात धरण पुर्ण क्षमतेने १५ वेळा भरलं आहे. यावर्षी तर सलग तीन वर्षांपासून पुर्ण क्षमतेने भरुन हॅट्ट्रिक केली आहे.