आडस-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात;दोन ठार, चार गंभीर

लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी आडस रोडवर उमराई पाटीजवळ घडली आहे. जखमींवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेला दुचाकीस्वार मात्र दुचाकीसह पसार झाला. अपघात ग्रस्त वाहन माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील आहे.
खय्युम अब्बास अतार (वय ४५ वर्ष) , शौकत अहेमद शेख (वय ४६ वर्ष) असे अपघातातील दोन्ही मयतांची नावे असून जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघात ग्रस्त हे पात्रुड (ता. माजलगाव) येथून लग्नासाठी अंबाजोगाईकडे जात होते. दरम्यान त्यांचे वाहन आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील उमराई पाटी जवळ असलेल्या दत्त मंदिर जवळ आले असता त्यांची इर्टिगा कार क्र. एम.एच. ०५ सी व्ही ९१८६ समोर दुचाकीस्वार आला. त्यास धडक लागू नये म्हणून चालकाने कार रस्त्याच्या खाली घेतली असताना नियंत्रण सुटून कार पलटी झाली. यामधील प्रवाशांना गंभीर मार लागला यातील दोघांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी आहेत. स्थानिक व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मदत करीत जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. वाढते अपघात पहाता हा पूर्ण रस्ताच चौपदरी होणे आवश्यक असून, सध्या उमराई-सनगाव शिवारापर्यंत रस्ता चौपदरी झाला आहे. त्यापुढेही आडस पर्यंत चौपदरी करण्याची मागणी करण्यात येत आहे.