आडस-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघातात दोन डॉक्टर ठार: दोन डॉक्टर यामुळे बचावले?

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारचे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात अंबाजोगाई येथील दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आडस-अंबाजोगाई रस्त्यावर चनई शिवारात घडली आहे. दोन महिला डॉक्टरही याच कारने जाणार होते परंतु जाताना काही रुग्ण तपासणी करण्याचे राहिले असल्याने त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला अन् त्या या अपघातातून बचावल्याची चर्चा आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथील डॉक्टर आडस येथे आरोग्य शिबिरासाठी आले होते. शिबीर संपवून परत कार क्रमांक एम.एच. ४४ एस ३९८३ मध्ये जाताना जनाई स्टोन क्रेशर आर एन विट भट्टी दरम्यान असलेल्या वळणावर कार वरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन झाडावर जोरात धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते हे दोघे जागीच ठार झाले. याच वाहनात येताना दोन महिला डॉक्टरही याच कारमध्ये आडस येथे शिबिरासाठी आले होते. जाताना काही रुग्ण तपासणी करण्याचे राहिले असल्याने दोन्ही महिला डॉक्टरांनी नंतर येतोत म्हणून सांगितले. सातपुते व बुरांडे यांना घाई असल्याने ते दोघेच गेले. अन् अवघ्या १५ मिनिटांत अपघाताची बातमी धडकली.