आडसमध्ये पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर; आज कापूस १०८०० प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी

खरीप हंगामात कापसाची लागवड वाढणार का?
लोकगर्जना न्यूज
कधी नव्हे ती कापसाला ऐतिहासिक असा प्रतिक्विंटल १० हजार ८०० रुपये विक्रमी दर मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हे वाढते दर पहाता पुन्हा कापासाकडे शेतकरी वळून खरीप हंगामात लागवड वाढेल का? अशी चर्चा सुरू आहे.
कापसासाठी येणारं खर्च व मेहनत त्यात बोंड अळी, लाल्या सह विविध रोगांचा प्रादुर्भाव व घटता उतार पहाता कापूस न परवडणारे पीक ठरले आहे. या कारणांमुळे शेतकरी सोयाबीन पीकाकडे वळला आहे. गतवर्षी खरीप हंगामात सर्वाधिक पेरा झाल्याने कापसाला मागे टाकून सोयाबीन प्रमुख पीक ठरले आहे. गतवर्षी सोयाबीन ही प्रतिक्विंटल ११ हजार असे विक्रमी दारापर्यंत गेले होते. हे ही सोयाबीन कडे शेतकऱ्यांचं कल वाढण्याचे कारण सांगितले जात आहे. यावर्षीही सोयाबीनला तसं सरासरी ६९०० ते ७००० दर मिळतो आहे. परंतु मागील वर्षाचे दर पहाता शेतकऱ्यांची अपेक्षा वाढलेली आहे. तसेच सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार सुरू राहतं असल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. या तुलनेत कापसाला या वर्षीच्या हंगामात सुरवाती पासून ८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. यातही चढ उतार सुरू होते. कापसाचे सिझन आता अंतिम टप्प्यात असून तरीही दर वाढत आहेत. सोमवारी ( दि. २१ ) आडस येथील खाजगी व्यापाऱ्यांनी तब्बल १० हजार ८०० प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला. हा आजपर्यंतचा सर्वाधिक असा विक्रमी दर आहे. यावर्षीही अतिवृष्टीमुळे कापसाला फटका बसून उत्पादन घटले आहे. परंतु वाढते दर पहाता शेतकऱ्यांचे नुकसान काही अंशी भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कापसाचे वाढते दर पहाता शेतकरी पुन्हा एकदा कापसाकडे वळले असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे पुढील खरीप हंगामात कापसाची लागवड वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कापसाचे बियाणे ही सदोष व उत्कृष्ट दर्जाचे येणं आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांमधून बोललं जातं आहे. डबल बीटी बियाणे असतानाही बोंड अळीचे प्रमाण जैसे थे असल्याने बियाणे बाबतीत चर्चा केली जात आहे.