परिक्षांच्या काळात तरी आडसवर लादण्यात आलेले भारनियमन बंद होईल का? विद्यार्थ्यांचा प्रश्न

आडस : येथे गावठाण फिडर वेगळे नसल्याने घरगुती वापरासाठी नियमित वीज मिळावी म्हणून सिंगल फेज योजना सुरू करण्यात आली. परंतु भार जास्त असल्याने सिंगल फेजचे रोहित्र कमी क्षमतेचे असल्याने ते सतत जळत आहेत. या घटना रोखण्यासाठी महावितरण कंपनीने आडस येथे पहाटे पाच ते सकाळी ८ असे तीन तासांचे भारनियमन लादले आहे. हे लादलेले भारनियमन परिक्षांच्या काळात तरी बंद होईल का? असा प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.
सध्या ही शेतीसाठी ८ तास वीज मिळत असून, १८ तासांचे भारनियमन सुरू आहे. १८ तास शेतीचा वीजपुरवठा बंद असतो. या काळात गावांमध्ये अंधार होऊ नये व घरगुती वापरासाठी २४ तास वीज मिळावी म्हणून महावितरण कंपनीने ग्रामीण भागात सिंगल फेज योजना सुरू केली. ही योजना लहान गावांसाठी उपयुक्त ठरली आहे. परंतु आडस सारख्या मोठ्या गावात सिंगल फेज योजना डोके दुखी ठरली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक असल्याने वीजेची मागणी जास्त असल्याने येथे गावात थ्री फेज रोहित्र असने आवश्यक आहे. परंतु गावठाण फिडर वेगळे नसल्याने येथेही सिंगल फेज वीजपुरवठा सुरू आहे. ग्राहक जास्त असल्याने वीज मागणीही जास्त परंतु सिंगल फेजच्या विद्युत रोहित्राची क्षमता कमी असल्याने ते सतत जळत आहेत. रोहित्र जळत असल्याने यासाठी गावठाण फिडर वेगळे करून गावातील सिंगल फेज रोहित्र काढून थ्री फेज रोहित्र बसविण्या ऐवजी रोहित्र जळू नये म्हणून महावितरण कंपनीने आडस येथे पहाटे ५ ते सकाळी ८ असे तीन तासांचे अधिकृत व या व्यतिरिक्त ही वीज पुरवठा बंद करत भारनियमन सुरू केले आहे. हा प्रकार म्हणजे ‘रोगा पेक्षा विलाज जालिम’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच ४ मार्च पासून इयत्ता १२ च्या परिक्षा सुरू झालेल्या आहेत तर, १५ मार्च पासून १० च्या परिक्षा सुरू होणार आहेत. परिक्षांच्या काळात विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. त्यामुळे वीजपुरवठा सुरू रहाणं आवश्यक आहे. परंतु येथे तर खास अभ्यासाच्या वेळेत भारनियमन आहे. परिक्षा सुरू झालेल्या माहिती असतानाही दररोज भारनियमन नियमित वेळेत सुरुच आहे. त्यामुळे परिक्षांच्या काळात तरी हे लादलेले भारनियमन बंद होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावठाण फिडर कधी होणार?
आडस येथे गावठाण फिडर मंजूर झालेले असून, खरीप व रब्बीचे पीक शेतात असल्याने एक नवीन विद्युत लाईन टाकण्यासाठी पोल बसवण्यासाठी खड्डे खोदावे लागणार आहेत. यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते म्हणून काम थांबविले असल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्व पिके निघाली असून रान रिकामी आहेत. त्यामुळे तातडीने गावठाण फिडरचे काम करून गावातील सिंगल फेज रोहित्र काढून नवीन थ्री फेज रोहित्र बसविण्यात यावेत व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.