केजकरांचा मातब्बरांना धक्का.. कामे करा अन्यथा….? मतदारांनी संदेश दिल्याची चर्चा

लोकगर्जना न्यूज
केज येथील नगर पंचायतीच्या निवडणूकीचे आज निकाल हाती आले. यामध्ये जनतेने जनविकास परिवर्तन आघाडीला पहिली पसंती दिली परंतु पॅनल प्रमुख हारुन इनामदार यांना पराजय पहावं लागलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या पराभुत झाली असून खासदार रजनी पाटील यांची सत्ता असतानाही कॉंग्रेसला केवळ तीन जागांवर विजय मिळविता आला. त्यामुळे मातब्बरांना हा धक्का असून “तुम्ही कामं करा तरच आम्ही तुम्हाला सत्तेत बसवू” ती शक्ती आमच्या मतदानात असल्याचा संदेश केजकरांनी दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
भाजपाला येथे उमेदवार मिळाले नाही की, त्यांना नगरपंचायत निवडणुकीत रस नव्हता हे त्यांनाच माहीत. परंतु भाजप मुक्त केज नगर पंचायतीची निवडणूक झाली. तर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे होम पीच म्हणून केजला ओळखले जाते. खासदार रजनी पाटील यांचे गाव असून त्यांच्याच पक्षाची येथे सत्ता होती. या निवडणूकीत मतदारांनी कॉंग्रेसला सपशेल नकारले असून त्यांचे केवळ तीन सदस्य विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी त्यांची कन्या डॉ. हर्षदा यांना प्रभाग क्रं. २ मध्ये उमेदवारी दिली होती. परंतु येथे मतदारांनी हर्षदा यांचा पराभव केला. मागील अनेक वर्षांपासून केजच्या राजकारणात सक्रिय व वजनदार कार्यकर्ते म्हणून हारुन इनामदार यांची ओळख आहे. यावेळी ते जनविकास आघाडीच्या माध्यमातून नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरले आहेत. मतदारांनी जनविकास आघाडीला स्विकारुन त्यांच्या ८ उमेदवारांना विजयी केले. परंतु प्रभाग ६ मध्ये हारुन इनामदार यांना मतदारांनी नाकारले आहे. येथे त्यांना पराभव पत्करावा लागला असून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी केले. त्यामुळे येथील मतदारांनी जे मातब्बर समजले जातात त्यांनाच मतपेटीतून धक्का दिला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पाच वर्षांसाठी आम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्याकाळात तुम्ही काय कामे केली? याचा हिशोब आम्ही ठेवतोत. पाच वर्षांनंतर आम्ही कोणाला सत्ता द्यायची आणि कोणाला नाही हे ही ठरवितो असा संदेशच केजच्या मतदारांनी मतपेटीतून दिल्याचं बोललं जातं आहे. यातून धडा घेऊन सत्तेत येणारे केज शहराचा विकास करतील का? हे येत्या काळात दिसून येईल.