अभिनेत्री प्रिन्सेस डॉली घोक्षे यांना देवदत्त फिल्म सन्मान

बीड : जिल्ह्याच्या भूमिकन्या अभिनेत्री प्रिन्सेस डॉली घोक्षे यांना नाटक, मालिका आणि चित्रपट अभिनयातील योगदानासाठी देवदत्त फिल्म्सने सन्मानित केले आहे.
औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात स्वातंत्र्यदिनी संपन्न झालेल्या भव्य समारंभात प्रिन्सेस डॉली घोक्षे यांना सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक ‘निखारे’ फेम डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या ‘देवदत्त फिल्म्स’ ने हा सन्मान प्रिन्सेस डॉली घोक्षे यांना औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. अशोक थोरात यांच्या हस्ते प्रदान केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले हे होते तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रिन्सेस डॉली घोक्षे यांनी असंख्य नाटके आणि मालिका यांमधून आव्हानात्मक भूमिकांद्वारे कसदार अभिनय केला असून विविध चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये त्या सध्या व्यस्त आहेत.
आपल्या मराठवाड्याने या सन्मानाच्या माध्यमातून आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया प्रिन्सेस डॉली यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. आपले वडिल नाटककार – अभिनेते प्रा. बापू घोक्षे यांचे बोट धरून मराठवाड्याच्या रंगभूमीवरच आपण प्रथम चालायला शिकलो असून या मातीने दिलेले प्रेम आपण कदापि विसरू शकणार नसल्याची कृतज्ञताही प्रिन्सेस डॉली यांनी व्यक्त केली.
कमी वयातच नाट्य आणि टिव्ही क्षेत्रात आपली ओळख निर्माण करीत ‘देवदत्त फिल्म्स सन्मान’ प्राप्त केल्याबद्दल प्रिन्सेस डॉली घोक्षे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन शितल पांचाळ यांनी केले तर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेलेखक- दिग्दर्शक संजय राजुरकर, ॲड. सचिन म्हात्रे, शामल म्हात्रे, स्नेहल म्हात्रे यांनी परिश्रम घेतले.