अनागोंदी कारभार भोवला; बीड न.प.च्या सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

आ. मेटेंची लक्षवेधी व शासनाची घोषणा!
बीड : येथील नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा मुद्दा आ. विनायक मेटे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधीमंडळात उपस्थित केला. याची गंभीर दखल घेत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी मुख्याधिकारी सह सहा जणांच्या निलंबनाची घोषणा करत चौकशीसाठी समिती गठीत करण्याची घोषणा केली. अनागोंदी कारभार चांगलाच भोवल्याची चर्चा सुरू आहे.
बीड नगर परिषद म्हणजे कुरण समजून मनचाहे व एक हाती कारभार असल्याचे आरोप नेहमीच होतात. येथील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत तसेच काही ना काही कारणाने ही बीड न.प. नेहमीच चर्चेत असते. शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे यांनी बीड नगर परिषद व येथील कारभारा बाबतीत विधीमंडळात लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. नागरिकांच्या सुविधांचा अभाव, लोकप्रतिनिधींच्या बैठकांना उपस्थित न राहाणं, कामातील अनियमितता, पाणी, दिवाबत्ती आदि प्रश्न उपस्थित केले. यावर चर्चा होऊन यात इतरही सदस्यांनी सहभाग घेतला होता. याची गंभीर दखल घेत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी अनियमितता, कर्तव्यात कसूर असा ठपका ठेवत डॉ. गुट्टे उत्कर्ष ( मुख्याधिकारी ), टाकळे राहुल ( पाणी पुरवठा अभियंता ), अंधारे नीता ( जिल्हा प्रशासन अधिकारी ), जाधव सुधीर ( कर अधीक्षक ), हाडे योगेश ( अभियंता, बांधकाम ), सय्यद सलीम याकुब ( कनिष्ठ सहाय्यक रचनाकार ) या सहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची घोषणा केली. असेच प्रकार अनेक ग्रामपंचायतीत ही असून यावरही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी चर्चा ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.