क्राईम

केज येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात युवकाचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

 

केज : शेतातील विद्युत रोहित्र जळून २७ दिवस उलटून गेले. अनेक वेळा मागणी करुन ही महावितरण कंपनीचे अधिकारी दुसरं रोहित्र देत नसल्याने त्रस्त शेतकरी तरुणाने आज दुपारी २ च्या सुमारास चक्क मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महादेव त्रिंबक घुले असे या टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या शेतातील रोहित्र जळाल्याने तब्बल २७ दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. वीज अभावी पाण्याविना शेतातील पीक जळून जात आहे. त्यामुळे महादेव घुले यांना अनेक वेळा जळालेले रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. परंतु महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांना विनंती करुनही ते लक्ष देत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकरी तरूणाने टोकाचे पाऊल उचलत विद्युत रोहित्र बदलून द्या अशी मागणी करत आज सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बीड रोडवरील बीएसएनएल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तरूण शेतकरी टॉवरवर चढल्याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी टॉवर कडे धाव घेतली. घटनास्थळी जाऊन तरुणाला कारण विचारुन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेऊन त्यास रोहित्र बदलून देण्याचं आश्वासन दिले. यानंतर महादेव घुले खाली उतरला. तो उतरताच प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. तरुण टॉवरवर चढल्याने बीएसएनएल कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनाची केज मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »