अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान शेतकरी बांधवांनो प्रथम हे काम करा?

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. यामुळे शेतात पाणी जमा होऊन सोयाबीन कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तसाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून ऑनलाईन तक्रार करावी. शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर विमा कंपनी क्लेम देते. त्यामुळे प्रथम तक्रार करा असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या सोयाबीन काढणी सुरू असून, यामुळे शेतात पाणी जमा झाल्याने उभं व काढून ठेवलेलं पीक पाण्यात बुडाले तर बोंड फुटलेल्या कापसाची वात झाली. या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आधीच गोगलगाय, पावसाची दडी, येलो मोझॅकमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. या संकटातून वाचलेले पीक काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे परंतु परतीच्या पावसाने या आशेवरही पाणी फेरल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस थांबला नाही तर सोयाबीनला करे फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून विमा कंपनीकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
*नुकसान झालेल्या प्रत्येकाने तक्रार करावी
अनेकवेळा नुकसान होऊन ही पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. यासाठी कोर्टापर्यंत लढा दिला व सुरू आहे. पण कंपनीचे ७२ तासात तक्रार केली नाही हे एकच म्हणनं असल्याचे ऐकिवात व वाचण्यात येतं. त्यामुळे दुसरे काम बाजूला ठेवून अगोदर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे ऑनलाईन तक्रार करा. नुकसानीचे, शेतातील जमलेल्या ढवाचे फोटो त्यात अपलोड करा.
*हे तरी नुकसान विमा कंपनीला दिसेल का?
ऑगस्ट महिन्यात पावसा अभावी पीक करपून गेलं. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक जिल्ह्यातील हे नुकसानच विमा कंपनीला दिसला नाही. आता जिल्हा भरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोयाबीनची माती व कापसाच्या वाती झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हे तरी नुकसान विमा कंपनीला दिसेल का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.