अंबाजोगाई तालुक्यातील थरार धारदार शस्त्राने वार करुन हत्या
घटनास्थळी एएसपी पंकज कुमावत यांची भेट; ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : तालुक्यात केंद्रेवाडी येथे शेतात झोपलेल्या शेतकऱ्यावर अज्ञात मारेकऱ्यांने धारदार शस्त्राने अनेक वार करुन निर्दयपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी ( दि. ६ ) रात्री १२ वा. सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच धारुर पोलीस ठाणे प्रभारी सपोनि विजय आटोळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले तर एएसपी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट देवून सूचना दिल्या असून ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आले.
पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दत्तात्रय रामभाऊ गायके असे मयताचे नाव असून, मंगळवारी ( दि. ६ ) ते रात्री गिरी वस्ती जवळ असलेल्या स्वतः च्या शेतात झोपण्यासाठी गेले होते. रात्री अंदाजे १२ वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करत अनेक वार केले. यावेळी एकदाच फक्त मोठा ओरडण्याचा आवाज आल्याने काहीजण धावत गेले. त्यावेळी एक व्यक्ती तेथून पळून गेलेला दिसून आला. परंतु अंधारामुळे तो कोण होता? ओळखता आले नाही. लोक घटनास्थळी पोचले असता मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. रात्रीच धारूर पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच धारुर पोलीस ठाणे प्रभारी सपोनि विजय आटोळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे आदि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. हा प्रकार नेमका काय? कोणी केली हत्या हे फिर्यादीवरून व पोलीस तपासात निष्पन्न होईल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एएसपी पंकज कुमावत यांची भेट
केंद्रेवाडी येथे हत्या झाल्याची माहिती मिळताच केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा पदभार असलेले एएसपी पंकज कुमावत यांनी केंद्रेवाडी येथे बुधवारी सकाळी भेट दिली. याबाबत धारुर पोलीसांना सूचना दिल्या आहेत. त्यावरून तपास करण्यात येत आहे.
ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण
हत्येचा गंभीर प्रकार घडल्याने आरोपीला निष्पन्न करण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.