अंबाजोगाईत आमदाराच्या शिपायाच्या गळ्याला चाकू लावलं; अक्षय मुंदडांना दिली धमकी

अंबाजोगाई : आमदार नमिता अक्षय मुंदडा या परिवारासह ऊसाचे रस पिण्यासाठी बीड रोडवर गेल्या होत्या. यावेळी काहींनी त्यांच्या शिपायाच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम लुटल्याचा प्रकार भरदिवसा घडला. यावेळी शिपायाला मदत करण्यासाठी अक्षय मुंदडा धावून आले असता त्यांनाही धमकी दिली. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी ( दि. २१ ) सायंकाळी ५ च्या सुमारास केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा , अक्षय मुंदडा हे ऊसाचे रस पिण्यासाठी बीड रोडवरील एका रसवंतीमध्ये गेले . यावेळी मुराजी हे त्यांचे शिपाई ही सोबत होते. ते रस पिऊन झाल्याने बाहेर येऊन रस्त्यावर उभे होते. त्यावेळी बाजुच्या हॉटेलमधून लखन भाकरे पाच जणांसोबत आला व मुराजींच्या गळ्याला चाकू लावून दिड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, खिशातील ६ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि साथीदारांकडे दिले . शिपायाने आरडाओरडा केली. ते ऐकून अक्षय मुंदडा सह इतर धावत आले. त्यावेळी अक्षय मुंदडा यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली . मुराजी प्रकाश साखरे यांनी असे पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी लखन भाकरे व त्याचे साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.