अंबाजोगाईत खळबळ! संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला

लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : शहरामध्ये येल्डा रस्त्यावर एका ३१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आज सकाळी आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ माजली असून नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी येल्डा रोडणे दुध घेऊन येणाऱ्यांना अजमेर नगर परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती अंबाजोगाई पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केला. ईश्वर अरुण जोगदंड ( वय ३१ वर्ष ) रा. परळी वेस साठे नगर, अंबाजोगाई असे मयताचे नाव आहे. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली यानंतर या घटनेचा सोक्षमोक्ष लावून गुन्हेगारांवर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्या समोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती ओळखून पोलीसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर काहीसे वातावरण निवळले. अद्याप हा प्रकार नेमका काय? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी भररस्त्यात एक खूनाचा प्रकार घडलेला असताना पुन्हा या तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ माजली आहे.