अंतिम गट, गण रचना जाहीर;हरकती नंतर काय झाले बदल?

लोकगर्जना न्यूज
बीड : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम रचना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ( दि. २७ ) जाहीर केली. यापुर्वी रचना जाहीर करुन हरकती मागविल्या होत्या. एकूण १५१ हरकती आलेल्या होत्या. परंतु यातील ५ हरकती ग्राह्य धरण्यात आले असून यामुळे गेवराई, माजलगाव, केज, आष्टी तालुक्यात काही बदल झाले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नवीन गट, गणांची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये नवीन रचनेत जिल्ह्यात जि.प. गटांची एकूण संख्या ६९ तर पं.स. गणांची संख्या १३८ झाली असून गट ९ तर गण १८ अशी वाढ झाली आहे. यापुर्वी गट, गण जाहीर करुन प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. जिल्ह्यातून या विरुद्ध १५१ हरकती प्रशासनाकडे करण्यात आले होते. याबाबतीत विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली परंतु या सुनावणीस हरकती घेणारे उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे १५१ पैकी अवघ्या ५ हरकती आयुक्तांनी ग्राह्य धरुन पडताळणी अंती निर्णय दिला. त्यानुसार केज तालुक्यातील चिंचोळी माळी गटातील बोबडे वाडी युसुफ वडगाव गटात समाविष्ट करण्यात आली. तसेच गेवराई तालुक्यातील रेवकी जि.प. गटात असलेला गैबी तांडा आता धोंडराई जि.प. गटात समाविष्ट करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील टाकरवण जि.प. गटातील वाघोरा गणातील सुर्डी नजीकचा टाकरवण गणात तर, बाराभाई तांडा वाघोरा गणात समाविष्ट करण्यात आलं आहे. आष्टी तालुक्यात लोणी, कडा गटात एका-एका गावांचा बदल झाला आहे. या बदलांसह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम रचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जाहीर केली. काय? बदल होणार याकडे लक्ष लावून बसलेल्या पुढारी व मतदारांची ही उत्सुकता संपली परंतु आता आरक्षण कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे. जि.प., पं.स. निवडणूक लढविण्यासाठी इच्छूकांचे गट, गणात दौरे वाढणार आहेत.