बीडमध्ये अजित पवारांची घडी विस्कटली; डॉ. योगेश क्षीरसागर आघाडी करुन लढवणार?

लोकगर्जनान्यूज
बीड : डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मुळे राष्ट्रवादीची विधानसभा मतदारसंघात अन् शहरात ही बूथ निहाय बांधणी झाली. त्यांचाच गटबाजी करुन विरोध करण्यात येत आहे. पूर्ण यंत्रणा त्यांच्याकडे तयार असतानाही सर्वच गट मिळून विरोध करीत असल्याने या गटबाजीला कंटाळून त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून, पक्ष श्रेष्ठिंनाही त्यांनी याची कल्पना दिल्याची सुत्रांची खात्रीलायक माहिती आहे. ते नगरपरिषद निवडणुक आघाडी करुन अथवा भाजपात प्रवेश करुन लढवणार असल्याची चर्चा आहे. यामुळे बीडमध्ये राजकीय भूकंप झाला असून, या गटबाजीचा फटका बसून अजित पवारांच्या पक्षाची घडी विस्कटणार असे दिसून येत आहे. तर ज्यांचे वडील शहराचे ४० वर्ष नगराध्यक्ष होते. ज्या क्षीरसागरांकडे पूर्ण यंत्रणा तयार आहे. तेच जर ऐन निवडणुकीच्या तोंडावर वजा झाले तर राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे कठीण होईल आणि पक्षाचा धुरळा उडेल अशी बीड शहरात जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून अजित पवार एक गट घेऊन बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले. तेंव्हा पक्षाची बीड मतदारसंघात कसलीही यंत्रणा नव्हती. अशावेळी विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरा आधी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आ. धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांनी कामाला सुरुवात करुन बीड विधानसभा मतदारसंघ आणि शहरात शेवटच्या घटकांपर्यंत काम करुन बूथ निहाय संघटन करुन पक्षाला बळ दिले. पण सत्तेतील पक्ष असल्याने मलिदा मिळणार या आशेने आनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रवेश करणाऱ्यांनी आपले स्वतंत्र गट निर्माण केले. या गटांनी सरळ डॉ. योगेश क्षीरसागर यांना पक्षात राहून टोकाचा विरोध सुरू केला. या मुळेच विधानसभेची उमेदवारी त्यांना ऐनवेळी घोषित झाली. तरीही त्यांनी राजकीय डावपेच आणि यंत्रणेच्या जोरावर तुल्यबळ अशी लढत दिली. त्यांचा निसटता पराभव झाला. पण या पराभवाला गटबाजी हे एकमेव कारण आहे. तेंव्हा ही या गटांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना विरोधच केला. तसेच कार्यकारिणी व पदे देण्याच्या वेळी पक्षाने डॉ. क्षीरसागर यांच्या विरोधातील चेहरे शोधून पदे दिली. तरीही ते शांत राहिले. पण नगरपरिषद निवडणुकीत ही तेच होताना दिसत आहे. यंत्रणा क्षीरसागरांनी लावायची जबाबदारी त्यांनी घ्यायची विरोध ही त्यांनाच. सध्या ही ५२ जागे पैकी ३० जागा द्या अशी क्षीरसागर विरोधी गटाची मागणी आहे. ते यासाठी तुल्यबळ उमेदवार न देता कोणाचीही शिफारस करीत आहेत. तर डॉ. योगेश क्षीरसागर हे या गटांना १५ जागा देण्यासाठी अनुकूल असून, त्यांच्याकडे सध्या २६ प्रभागातील ५२ ही तगडे उमेदवार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी वजनदार चेहरा आहे. पण गटबाजीमुळे निर्णय घेता येत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तर गटाचे प्रमुख ज्यांना उमेदवारी मागतात त्यांना उमेदवारी दिली तर पक्षाचा आजच पराभव दिसतोय. पण पक्षाचा विचार न करता हे गटबाज फक्त स्वतः चा विचार करीत आहेत. याबाबत डॉ. क्षीरसागर यांनी पक्ष प्रमुखांना सांगून निर्णय घेण्यास सांगितले आहे. गटबाजीला कंटाळून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी चक्क पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याची सुत्रांची खात्रीलायक माहिती आहे. ते तगडे उमेदवार घेऊन आघाडी बनवून नगरपरिषदेच्या रणांगणात उतरु शकतात. यासाठी त्यांचे बीड जनता आघाडी, बीड शहर विकास आघाडी ही नावे ही निश्चित झाले आहेत. या आघाडीत ते भाजपाला सोबत घेऊ शकतात अथवा भाजपातही प्रवेश करु शकतात अशी शक्यता आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची घडी विस्कटणार असे दिसून येत आहे. तर बीडमध्ये राष्ट्रवादीतून क्षीरसागर वजा केले तर खाली काहीच शिल्लक राहत नाही. यांना उमेदवार मिळणे कठीण होईल अशी चर्चा असून, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी खरंच वेगळा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा निवडणुकी आधीच धुरळा उडणार अशी चर्चा शहरात आहे.
जे विधानसभेला तेच आता ही
विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही या गटबाजीमुळे डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी घोषित होण्यास उशीर झाला. तरीही त्यांनी तब्बल ९६ हजार मते घेतली. पण पराभव झाला. आताही गटबाजी उफाळून आली असून स्वतः विजयी होणार की, नाही. खात्री नसणारे दुसऱ्यांची जबाबदारी घेत डॉ. योगेश क्षीरसागर यांना विरोध करीत आहेत. खर्च, यंत्रणा लावणार क्षीरसागर अन् आयती मलाई खाण्यासाठी गटबाजी करणारे बोके पुढं असे काहिसे चित्र बीड शहराचे दिसून येत आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आपली ताकद कायम ठेवायची असेल तर पूर्ण जागा डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडच द्यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.