शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीनचे दर वाढले; चार दिवसांपासून वाढ कायम

लोकगर्जनान्यूज
बीड : यंदा अतिवृष्टीचा फटका बसून सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. त्यात बाजारात पडलेले भाव आणि हमीभाव खरेदी केंद्रावर नियमांवर बोट ठेवून नाकारण्यात येत असलेल्या सोयाबीन यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र मागील चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसत आहे. यात सातत्याने वाढ होत असून, लातूर बाजारात काल सोयाबीन ४ हजार ९०० ते ५ हजार १०० पर्यंत दर गेला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसांच्या नंतर सोयाबीन दरात सुधारणा दिसत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
यंदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आला होता. यामध्ये सोयाबीन वाहून गेले तर पिकांना पाणी लागून उत्पादनात घट झाली. तसेच पावसाळा लांबल्याने सोयाबीमध्ये ओलावा आणि डॅमेज (डागिल) झाले आहेत. यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरुन बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन परत पाठविण्याचे प्रकार होत आहेत. शेतकऱ्यांना ना विलाज म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खुल्या बाजारात कवडीमोल दराने विक्री कारावे लागतं आहे. यामुळे प्रति क्विंटल मागे ८०० ते ९०० रुपयांचा फटका सहन करावा लागत होता. तर उत्पादन घटून ही दर काही वाढण्याचे नाव घेत नसल्याने बरेच दिवस सोयाबीन ४ हजार ५०० वर स्थिर होते. यामुळे खर्च निघणं ही मुश्किल झाले होते. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र मागील चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. प्रथम ४ हजार ५०० चे सोयाबीन ४ हजार ७०० झाले त्यानंतर ८०० आणि लातूर येथे तर शुक्रवारी (दि.२६) ४ हजार ९०० ते ५ हजार १०० पर्यंत गेला. बऱ्याच दिवसानंतर सोयाबीनने ५ हजारांचा पल्ला पार केला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी दर वाढतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच यावर्षी उत्पादन घटले असल्याने बाजारात आवक नियंत्रणात राहिली अन् मागणी वाढली तर आणखी सोयाबीनचे दर वाढतील अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. जर असे झाले तर ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
