सिताफळ कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकगर्जनान्यूज
बीड : सिताफळ उत्तम कृषी पद्धती याबाबत शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा येथील सिताफळ प्रक्रिया सुविधा केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती,बीड येथे पार पडली. यावेळी विविध कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर यावेळी महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क, प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सिताफळ उत्तम कृषी पद्धती बाबत कार्यशाळा मंगळवारी (दि.९) बीड येथे सिताफळ प्रक्रिया सुविधा केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना सिताफळ शेती कशी करावी, वाण कोणते निवडावे यासह त्याची बाजार पेठ आदी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. तर कृषी अधीक्षक अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांनी सिताफळ प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा, जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या सीताफळाच्या वाणांची लागवड करून शास्त्रीय दृष्ट्या त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे, डॉ. गोविंद मुंडे, राहुल घोरपडे, श्री. श्याम, गणेश पाटील, अक्षय हतागळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष साळवे, महादेव बडे, विलास जगताप, गणेश वाघ, गजेंद्र नवघरे, अक्षय हतागळे, जुबेर पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
