
लोकगर्जनान्यूज
बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२५ ची विमा योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. पण मागील वर्षीच्या तुलनेत बीड जिल्ह्यातील मिळालेला अल्प प्रतिसाद आणि इतर काही अडचणींमुळे शेतकरी वेळेत विमा भरु शकले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून पीक विमा योजनेला १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरुन आपले पीक संरक्षित करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
पंतप्रधान पीकविमा योजना २०२५ कर्जदार, बीगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असून, या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी व्हावे असे शासन आणि कृषी विभागाचा प्रमाणिक उद्देश आहे. यामुळे गत वर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टिक’ फार्मर आय डी नसणे, ‘पीएमएफबीवाय’ पोर्टल सेवेतील व्यत्यय आधार व सीएससी सर्व्हरवरील व्यत्यय राज्याच्या पोर्टलच्या तांत्रिक/सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांना योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १४ ऑगस्ट, २०२५ व कर्जदार शेतकऱ्यांना दि. ३० ऑगस्ट, २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या वेळेत पीक विमा भरुन घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
