शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणीसाठी तीनच दिवस उरले
लोकगर्जनान्यूज
बीड ई-पीक पाहणी करण्यासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत. कापूस आणि सोयाबीन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी गरजेचीचं असून जर ई-पीक पाहणी केली नसेल तर हे दोन्ही पिके हमीभाव खरेदी केंद्रांवर विकण्यास अडचणी येणार आहेत. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी तीन दिवसांत ई-पीक पाहणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतातील पिकांची नोंद सात बारावर लावण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हा मोबाईल ॲप आणला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करुन सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करायची आहे. या नोंदी नंतरच शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई आदी फायदा होणार आहे. या ई-पीक पाहणीची सुरुवात १ ऑगस्ट पासून सुरू झालेली असून १४ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. यामुळे आता केवळ ई-पीक पाहणी करण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाहणी केली नाही त्यांनी करुन घेणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव नेमके कसे राहतील याचा अंदाज येत नाही. या पिकांचे खुल्या बाजारात भाव कमी राहिले तर शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन हे हमीभाव खरेदी केंद्रांवर विकावे लागणार आहेत. येथे विक्रीसाठी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद आवश्यक आहे. जर नोंद नसेल तर येथे या पिकांची खरेदी केली जाणार नाही. यामुळे या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करुनच घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
