आडस पोलीस चौकी हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळआडस येथे ५ दुकाने तर आसरडोह मध्ये २ घरे फोडली

लाखोंचा ऐवज चोरीला; सीसीटीव्ही डीव्हीआर नेला चोरुन; आडस परिसरात दहशत
धारुर पोलीस ठाणे हद्दीतील आडस येथे मुख्य बाजारपेठ असलेली पाच दुकाने तर आसरडोह येथे दोन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम सह लाखोंचा ऐवज लंपास केल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच आडस चौकीच्या पोलिसांनी आडस,आसरडोह येथे भेट देऊन पंचनामा केला. तसेच बीड येथून ठसे तज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून एका ठिकणचा डीव्हीआर आणि एका ठिकाणचे कॅमेरे काढून नेले. एकाच रात्री ५ कि.मी.अंतरावरील दुकाने आणि दोन घरे फोडून धुमाकूळ घातल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोऱ्या आणि आडस हे समीकरण बनले असून, नेहमीच चोरीच्या घटना घडत आहेत. पण एकदाही हे चोरटे पोलिसांना सापडले नाहीत. यामुळे पोलिसांपेक्षा चोरटेच हुशार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर महिनाभरा पूर्वीच एक कपड्याचे दुकान फोडले होते तर त्या आगोदर भर चौकातील मश्नरीचे दुकान फोडले होते. याचा अद्याप तपास लागलेला नाही तोच गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आडस येथील महाराणा प्रताप चौकातील दोन मेडिकल फोडून रोख रक्कम आणि पवार यांच्या मडीकलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला. यानंतर पोलीस चौकी समोरील ओमकार ज्वेलर्स फोडले असून येथील ऐवज लंपास केला. तर पतंगे मोटार रिवायडिंगचे दुकान फोडून तांब्याची तार चोरुन नेली, तसेच साठे चौकातील मंगलदीप हे कपड्याचे दुकान फोडले आहे. या नंतर चोरट्यांनी येथून ५ कि.मी. असलेल्या आसरडोह कडे मोर्चा वळवला येथील बालासाहेब पिंगळे आणि गोविंद लक्ष्मण झाडगर या दोघांचे घर फोडले आहे. येथून रोख लाखो रुपये तसेच सोन्या, चांदीचे दागिने आदी ऐवज लंपास केला आहे. या सर्व घटना एकाच रात्री घडल्या असल्याने आडस परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. या सर्व ठिकाणी चोरट्यांनी लाखोंचा हात मारल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच आडस व धारुर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तर याचा शोध घेण्यासाठी बीड येथून ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमकं किती रक्कम व ऐवज चोरीला गेला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेने आडस परिसरात खळबळ उडाली आहे.
ऐन पोलीस चौकी समोरील दुकान फोडून पोलिसांना आव्हान
आडस पोलीस चौकीच्या समोरील म्हणजे फक्त मध्ये रस्ताच असलेले ओमकार ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी एक प्रकारे पोलीस प्रशासनाला आव्हान दिले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यामुळे पोलीस प्रशासन हे आव्हान स्वीकारुन चोरट्यांना जेरबंद करणार का? याकडे लक्ष लागले आहे.
नेहमीच चोऱ्या मात्र तपास एक ही नाही
आडस येथील चोरीच्या गुन्ह्यांचा मागोवा घेतला तर येथे एकप्रकारे चोरीच्या घटनांची मालिकाच दिसून येईल मात्र यातील एकाही चोरीचा अद्याप छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मात्र चोरटे चोऱ्या करण्यात नियमित यशस्वी होत आहेत. पण पोलीस शोध घेत नसल्याने पोलिसांपेक्षा चोरटेच हुशार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.