उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक दोघे गंभीर जखमी; बीड जिल्ह्यातील घटना

लोकगर्जनान्यूज
बीड : भरधाव वेगात चाललेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पती-पत्नी आणि दोन चिमुकले असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. जखमींना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजलगाव येथून धारुरकडे येत असताना धुनकवड ( ता. धारुर) फाट्यावर भरधाव वेगाने चाललेल्या ताफ्यातील एका गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन चिमुकले असे चारजण जखमी झाल्याची घटना आज शनिवारी (दि.२२) दुपारी घडली आहे. या चौघांना तातडीने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे प्रथम उपचार करुन चौघांना ही पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येथे उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
